Friday, February 22, 2013

थंडीचे दिवस होते रात्रीची वेळ होती. कारमधून घरी जातांना मला वाटेत एका कचराकुंडीवर एक ९-१० वर्षाचा मुलगा कचरा वेचतांना दिसला. त्या मुलाच्या हाताला जखम होती आणि त्या जखमेवर बँडेज बांधलेले होते आणि तरीही तो मुलगा तसाच कचरा वेचीत होता.....
कवितेचे शीर्षक आहे " बालपण हरवले बाल्य "
ते बालपण हरवलेले बाल्य
फिरत होतं गल्लीबोळात 
रात्री,अपरात्री
अगदी पर्वा न करता 
ऊन,पाऊस,थंडीचीही
तुडवत होतं त्याच अनवाणी पाऊल 
कचऱ्याचे ढिगामागून ढीग 
तो असह्य,कुबट वास तसाच सहन करत
शोधत होते त्याचे निरागस डोळे
आणि धडपडणारे हात,त्या कचऱ्यातून 
काच,लोखंड,प्लास्टिक,भंगार 
त्यावेळी हातापायाला होणाऱ्या जखमांची
तो करतही नव्हता मलमपट्टी 
ती जखम तशीच भळभळ वाहत होती 
कारण पोटाची आग त्याला आधी विझवायची होती
आणि हे सगळं,मी खिडकीतून बघत होते
आता ओला कचरा,सुका कचरा वेगळा ठेवायला हवा
हे स्वत:ला बजावत होते.
माझे डोळे भरून आले तरीही 
चौकटीबाहेर पडायचं
मला लवकर सुचलच नाही
आणि सुचलं तोपर्यंत
ते कचऱ्यात हरवलेले बाल्य
गेलं होतं दुसऱ्या गल्लीत
दुसरी कचरा कुंडी शोधायला
पण नकळत मला जागवून
पण नकळत मला जागवून 

ज्योती कपिले