Friday, February 22, 2013

थंडीचे दिवस होते रात्रीची वेळ होती. कारमधून घरी जातांना मला वाटेत एका कचराकुंडीवर एक ९-१० वर्षाचा मुलगा कचरा वेचतांना दिसला. त्या मुलाच्या हाताला जखम होती आणि त्या जखमेवर बँडेज बांधलेले होते आणि तरीही तो मुलगा तसाच कचरा वेचीत होता.....
कवितेचे शीर्षक आहे " बालपण हरवले बाल्य "
ते बालपण हरवलेले बाल्य
फिरत होतं गल्लीबोळात 
रात्री,अपरात्री
अगदी पर्वा न करता 
ऊन,पाऊस,थंडीचीही
तुडवत होतं त्याच अनवाणी पाऊल 
कचऱ्याचे ढिगामागून ढीग 
तो असह्य,कुबट वास तसाच सहन करत
शोधत होते त्याचे निरागस डोळे
आणि धडपडणारे हात,त्या कचऱ्यातून 
काच,लोखंड,प्लास्टिक,भंगार 
त्यावेळी हातापायाला होणाऱ्या जखमांची
तो करतही नव्हता मलमपट्टी 
ती जखम तशीच भळभळ वाहत होती 
कारण पोटाची आग त्याला आधी विझवायची होती
आणि हे सगळं,मी खिडकीतून बघत होते
आता ओला कचरा,सुका कचरा वेगळा ठेवायला हवा
हे स्वत:ला बजावत होते.
माझे डोळे भरून आले तरीही 
चौकटीबाहेर पडायचं
मला लवकर सुचलच नाही
आणि सुचलं तोपर्यंत
ते कचऱ्यात हरवलेले बाल्य
गेलं होतं दुसऱ्या गल्लीत
दुसरी कचरा कुंडी शोधायला
पण नकळत मला जागवून
पण नकळत मला जागवून 

ज्योती कपिले

Monday, December 24, 2012

Friday, May 4, 2012

Wednesday, July 13, 2011

शाळा सुटली पाटी फुटली


शाळा सुटली पाटी फुटली
ती चार वर्षाची पोर
आनंदाने घराकडे पळाली
समोरच उभा
तारवटलेल्या डोळ्यांनी
तिच्याकडे बघणारा
तिच्या झोपडीशेजारी राहणारा
तिच्या ओळखीचाच  माणूस
तीही त्याला बघून हसते
तो तिला चॉकलेट देतो
कडेवर घेवून तिचा गालगुच्चा घेतो
ती निरागस
आनंदाने चॉकलेट खाते
तो वासनांध
तिला  न्याहाळत  राहतो
बोलत बोलत तिला
घराकडे घेवून जाण्याऐवजी
भलतीकडेच घेवून जातो
तिची केविलवाणी किंकाळी
तो तिच्याच गळ्यात दाबून टाकतो
जिवंतपणीच तिची चिरफाड करतो
नंतर हात झटकून निघून जातो
संध्याकाळी तिचे आई-वडील कामावरून घरी येतात
रात्रभर तिला शोधत राहतात
सकाळी हाती लागत त्यांच्या
त्यांनाही उध्वस्त करणार
तिचं निष्प्राण कलेवर
तिच्या विस्फारलेल्या डोळ्यात
स्पष्ट उमटलेली असते
आता विश्वास तरी कोणावर ठेवावा ही वेदना...
-ज्योती कपिले.