Wednesday, July 13, 2011

शाळा सुटली पाटी फुटली


शाळा सुटली पाटी फुटली
ती चार वर्षाची पोर
आनंदाने घराकडे पळाली
समोरच उभा
तारवटलेल्या डोळ्यांनी
तिच्याकडे बघणारा
तिच्या झोपडीशेजारी राहणारा
तिच्या ओळखीचाच  माणूस
तीही त्याला बघून हसते
तो तिला चॉकलेट देतो
कडेवर घेवून तिचा गालगुच्चा घेतो
ती निरागस
आनंदाने चॉकलेट खाते
तो वासनांध
तिला  न्याहाळत  राहतो
बोलत बोलत तिला
घराकडे घेवून जाण्याऐवजी
भलतीकडेच घेवून जातो
तिची केविलवाणी किंकाळी
तो तिच्याच गळ्यात दाबून टाकतो
जिवंतपणीच तिची चिरफाड करतो
नंतर हात झटकून निघून जातो
संध्याकाळी तिचे आई-वडील कामावरून घरी येतात
रात्रभर तिला शोधत राहतात
सकाळी हाती लागत त्यांच्या
त्यांनाही उध्वस्त करणार
तिचं निष्प्राण कलेवर
तिच्या विस्फारलेल्या डोळ्यात
स्पष्ट उमटलेली असते
आता विश्वास तरी कोणावर ठेवावा ही वेदना...
-ज्योती कपिले.

Sunday, July 10, 2011

सावळ्या विठ्ठला ...

सावळ्या विठ्ठला | दर्शनाची  आस |
मनीचा हा ध्यास | निरंतर ||
सावळ्या विठ्ठला | चंद्रभागेतीरी |
भक्तांची हाळी | सर्वकाळ ||
सावळ्या विठ्ठला | वारकरी सखा |
जप अंतरीचा | श्वास झाला ||
सावळ्या विठ्ठला | तुझ्या पायी मुक्ती |
मागतसे 'ज्योती' | क्षणोक्षणी ||
--ज्योती कपिले 

Thursday, July 7, 2011

सुवर्णमध्य
दंग विठोबा आपल्या भक्तांसवे 
रुखमाईचे  त्याला भानही नाही
आता बोलेल तो मग बोलेल तो
ही आपली विठोबाची वाट बघत राही
विठोबाला सोडवत नाही भक्तांचा संग
गुलाल,बुक्का,तुळशीत सावळा दंग
बिचारी रुखमाई मागेच राही
विठोबाला रुखमाईसाठी
कधी वेळ मिळालाच नाही
युगानुयुगे लोटली
पण परिस्थितीत फारसा फरक पडला नाही
तेव्हा वाटलं,
आजचा विठोबा असा वागला तर
आजची रुखमाई कशी वागेल?
त्याची वाट बघेल का त्याला सोडून देईल?
तशी आजची रुखमाई हुशार आहे
ती त्याची फार वाट बघणार नाही,
वा त्याला पटकन सोडूनही जाणार नाही
ती बरोबर 'सुवर्णमध्य' साधेल
ती ठसक्यात भक्तांना म्हणेल,
"आधी प्रपंच करावा नेटका,परमार्थ साधावा तद्नंतर"
आणि विठोबालाच लाडीकपणे "हो की नाही हो"
असं विचारून त्याची साक्ष काढेल
"शहाण्याला मार शब्दांचा"
विठोबा आणि त्याच्या भक्तांना कळून चुकेल
आणि मग काय
विठोबा बरोबर रुखमाई,रुखमाई बरोबर विठोबा
असं सुखचित्र आपल्याला वारंवार दिसेल
असं सुखचित्र आपल्या मनावर ठसेल
--ज्योती कपिले.