Thursday, July 7, 2011

सुवर्णमध्य
दंग विठोबा आपल्या भक्तांसवे 
रुखमाईचे  त्याला भानही नाही
आता बोलेल तो मग बोलेल तो
ही आपली विठोबाची वाट बघत राही
विठोबाला सोडवत नाही भक्तांचा संग
गुलाल,बुक्का,तुळशीत सावळा दंग
बिचारी रुखमाई मागेच राही
विठोबाला रुखमाईसाठी
कधी वेळ मिळालाच नाही
युगानुयुगे लोटली
पण परिस्थितीत फारसा फरक पडला नाही
तेव्हा वाटलं,
आजचा विठोबा असा वागला तर
आजची रुखमाई कशी वागेल?
त्याची वाट बघेल का त्याला सोडून देईल?
तशी आजची रुखमाई हुशार आहे
ती त्याची फार वाट बघणार नाही,
वा त्याला पटकन सोडूनही जाणार नाही
ती बरोबर 'सुवर्णमध्य' साधेल
ती ठसक्यात भक्तांना म्हणेल,
"आधी प्रपंच करावा नेटका,परमार्थ साधावा तद्नंतर"
आणि विठोबालाच लाडीकपणे "हो की नाही हो"
असं विचारून त्याची साक्ष काढेल
"शहाण्याला मार शब्दांचा"
विठोबा आणि त्याच्या भक्तांना कळून चुकेल
आणि मग काय
विठोबा बरोबर रुखमाई,रुखमाई बरोबर विठोबा
असं सुखचित्र आपल्याला वारंवार दिसेल
असं सुखचित्र आपल्या मनावर ठसेल
--ज्योती कपिले.

No comments: